मुलगा ऐकत नसेल तर राग न करता वापरा हे ५ उपाय, मुलगा शिस्तीत राहायला शिकेल

आजकाल शाळांची सुट्टी सुरू असल्याने मुलांचा जास्त वेळ मोबाईल, टीव्ही आणि खेळण्यात जातो. यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि तब्येतीवरही परिणाम होतो. यामुळे पालकांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे. अनेकदा असं होतं की, वारंवार समजावूनही मुलं ऐकत नाहीत किंवा उलट उत्तर देतात. अशा वेळी पालक रागावतात, पण ही पद्धत फायद्याची ठरत नाही. आजची मुले त्यांच्या वयामानानुसार आजूबाजूचं जग समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानुसारच वागतात. त्यामुळे आपला संयम न गमावता शांतपणे योग्य मार्गाने संवाद साधणं गरजेचं आहे.


भावनिक जोड निर्माण करा

मुलाला एखादी गोष्ट सांगण्याआधी त्याच्याशी भावनिक संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. त्याच्या नावाने हळू आवाजात बोलणं, खांद्यावर हात ठेवणं किंवा त्याला जवळ घेणं, अशा लहानशा कृतीतूनही मुलं तुमच्याकडे लक्ष देऊ लागतात. यामुळे त्यांना सुरक्षित वाटतं आणि ते सहज संवाद साधतात.

डोळ्याला डोळा भिडवून बोला

दूरून आवाज देण्याऐवजी मुलाजवळ जाऊन त्याच्याशी डोळ्याला डोळा भिडवून बोला. पालक जेव्हा मुलांच्या डोळ्यात पाहून संवाद साधतात तेव्हा मुलांना आपण समजून घेतले जात आहोत असं वाटतं. त्यामुळे ते रागावण्याऐवजी सहकार्य करतात. त्यांच्या उंचीवर जाऊन, त्यांच्याशी थेट संपर्क ठेवणं खूप प्रभावी ठरतं.

शांत आणि मृदू आवाजात बोला

गोंधळ घालणाऱ्या किंवा घाईघाईच्या आवाजात बोलल्याने मुलं घाबरतात किंवा अजूनच बिथरतात. त्याऐवजी हळू, स्पष्ट आणि प्रेमळ आवाजात संवाद साधा. अशा प्रकारे बोलल्याने मुलं तुमचं म्हणणं नीट समजतात आणि सहकार्य करतात. आवाज शांत असेल तर मुलं जास्त विश्वासाने संवाद साधतात.

सोप्या शब्दांत सूचना द्या

लांबट आणि गुंतागुंतीच्या वाक्यांमुळे मुलं गोंधळून जातात किंवा काही लक्षात राहत नाही. त्यामुळे सूचना नेहमी छोट्या आणि स्पष्ट असाव्यात. उदाहरणार्थ, “खोली स्वच्छ ठेव” असं न सांगता, “तुझे खेळणी टोपलीत ठेव” असं थेट आणि सोपं वाक्य वापरा. अशा सूचनांचा परिणाम जास्त चांगला होतो.

आदेश न देता पर्याय द्या

मुलांना थेट आदेश देण्याऐवजी दोन पर्याय द्या. उदाहरणार्थ, “आधी दात घासशील की आधी पुस्तक वाचशील?” यामुळे मुलांना निवड करण्याची संधी मिळते आणि त्यांना तुमचं बोलणं सक्ती वाटत नाही. अशा संवादातून मुलं अधिक सहकार्य करतात आणि त्यांची निर्णय घेण्याची सवयही विकसित होते.

शेवटी, संयम हाच यशाचा मंत्र

मुलांच्या वाढत्या वयात त्यांचं वागणं बदलतं हे पालकांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांच्यावर ओरडून किंवा धमकावून उपयोग होत नाही. त्याऐवजी संवाद, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर तुम्ही त्यांना शिस्तीत राहायला शिकवू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा मुलं ऐकत नाहीत, तेव्हा राग न करता या साध्या पण प्रभावी उपायांचा वापर जरूर करा.